स्टोव्हचा भडका; महिला होरपळली

जेवण बनविताना स्टोव्हचा भडका उडाल्याने विवाहिता गंभीररित्या भाजल्याची घटना रविवारी सकाळी तळोजा येथील रोहिंजण गावात घडली. माया प्रमोद गौड (३६) असे या विवाहितेचे नाव असून ती या दुर्घटनेत ९० टक्के भाजल्याने तिला मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत मायाला वाचविण्यासाठी तिचा पती व त्याचा भाऊ हे दोघे पुढे गेल्याने त्यांचेदेखील हात भाजले आहेत.


माया गौड ही पती व इतर नातेवाईकांसह तळोजा येथील रोहिंजण गावाजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या झोपडीत राहते. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ती स्टोव्हवर जेवण बनवत असताना, अचानक स्टोव्हचा भडका होऊन तिच्या साडीने पेट घेतला. यावेळी घरात असलेल्या मायाच्या पतीने व तिच्या दिराने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांचे हातदेखील भाजले. या दुर्घटनेत माया ९० टक्के भाजल्याने तिला मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तळोजा पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद करण्यात आली आहे.