अग्निरोधक गणवेश बंधनकारक

नवी मुंबई अग्निशमन दलातील ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अग्निरोधक गणवेश देण्यात आले, त्यांना यापुढे प्रत्येक वर्दीवर हा गणवेश घालूनच जाणे बंधकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित अग्निशमन केंद्रातील केंद्र अधिकारी, सहाय्यक केंद्र अधिकारी, अग्निशमन प्रणेता यांच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. सीवूड्समध्ये लागलेली आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी हा गणवेश न घालता आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सात जवान जखमी झाले. त्याची दखल घेत पालिकेने हा निर्णय घेतला आहे.


नवी मुंबई अग्निशमन दलातील १३४ कर्मचारी, अधिकारी यांना हे नवीन विदेशी बनावटीचे गणवेश देण्यात आले. हे गणवेश अग्निरोधक आहेत. आगीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचा वापर करणे गरजेचे आहे, मात्र अनेक जवान हे गणवेश न घालताच आगीच्या वर्दीवर जातात. त्यामुळे जवान जखमी होण्याचे प्रकार घडतात. ते रोखण्यासाठी आणि जवानांना सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेच्या वतीने हा अध्यादेश काढण्यात आला.