वाचनामुळे आपले व्यक्तिमत्व सुधारते. चांगल्या वाचनासाठी चांगले साहित्य निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी देशात चांगले साहित्य निर्माण करणारे लेखक हवेत. ज्या देशात साहित्यिक मोठ्या प्रमाणात असतात, त्या देशाची प्रगती लवकर होते. त्यासाठी साहित्यिकांनी आपल्या कलेने नवनवीन साहित्य निर्माण करणे गरजचे आहे, असे प्रतिपादन आमदार निरंजन डावखरे यांनी ऐरोली येथे केले.
सागर शिक्षण संस्था, ठाण्याचे सचिव के. पी. पांडेय यांनी लिहिलेल्या हरिश्चंद्र की पीडा व कोई मेरे साथ चले या हिंदी काव्यसंग्रहांचे प्रकाशन आमदार डावखरे यांच्या हस्ते ऐरोली येथील जानकीबाई मढवी सभागृहात झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी डॉ. करुणाशंकर उपाध्याय, डॉ. शीतल प्रसाद दुबे, साहित्यिक सुधाकर मिश्र, डॉ. अनिल सिंह, डॉ. दयानंद तिवारी, सागर शिक्षण संस्थेचे विजय शाम मिश्रा, समाजसेवक अंकुश सोनावणे, प्राचार्य मनीषानंद पांडेय आदी उपस्थित होते.